महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय, पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय, पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीत सामान्य कर्करोगांचे पूर्व-तपासणी, लवकर निदान, प्रतिबंध व जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई व पनवेल महानगरपालिका यांच्यात विशेष करार करण्यात आलेला आहे. या कराराअंतर्गत आरोग्य यंत्रणा बळकट करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व समुदाय स्तरावर कर्करोग तपासणी सेवा सक्षम करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई (प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी सर्व्हिसेस, खोपोली) व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “सामान्य कर्करोगांचे प्रतिबंध, नियंत्रण व लवकर निदान” या विषयावर एएनएम व स्टाफ नर्सेससाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या पार पडली.
ही कार्यशाळा दिनांक २५ व २७ मार्च तसेच १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी सिडको समाज केंद्र, कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण १२० नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यशाळेमध्ये स्तन, गर्भाशय मुख (सर्व्हिकल) व तोंडाचा (ओरल) कर्करोग यांचे प्रमाण, जोखमीचे घटक, लक्षणे, तपासणी पद्धती व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एचपीव्ही डीएनए चाचणी, पॅप स्मीअर, VIA तपासणी यांचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. स्तन स्वयं-परीक्षण, तोंडाच्या कर्करोग तपासणी, तंबाखू निर्मूलन समुपदेशन व जनजागृती यावरही भर देण्यात आला.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्यासह कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी आशा सेविका व नर्सेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रशिक्षणाचा आढावा घेतला.
कोट
“महिलांचे आरोग्य हे समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लवकर निदान आणि जनजागृती यावर आधारित उपक्रम प्रभावीपणे राबवत आहोत. प्रत्येक महिलेला वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
ममता प्रितम म्हात्रे, महिला-बालकल्याण समिती
पनवेल महानगरपालिका

संपादक : नितीन जाधव





