सामाजिक

स्मार्ट डिजिटल शाळेकडे नागझरीची वाटचाल; विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला मिळणार नवी दिशा 


स्मार्ट डिजिटल शाळेकडे नागझरीची वाटचाल; विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला मिळणार नवी दिशा 

निप्पॉन पेंट इंडस्ट्रियल कोटिंग कंपनीकडून सीएसआर निधीतून संगणक, इंटरअॅक्टिव्ह बोर्ड व शैक्षणिक साहित्याची भेट

पनवेल, ता. १७ (प्रतिनिधी) : पनवेल तालुक्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेने आता स्मार्ट डिजिटल शाळेकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. तलोजा औद्योगिक वसाहतीतील निप्पॉन पेंट इंडस्ट्रियल कोटिंग कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून शाळेला पाच संगणक, इंटरअॅक्टिव्ह बोर्ड आणि विविध शैक्षणिक साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला नवी दिशा दिली आहे.

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख लहान वयातच होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने निप्पॉन कंपनीने हा उपक्रम राबविला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावी, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. संगणक आणि इंटरअॅक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने अध्यापन अधिक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांच्या कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे.

यावेळी कंपनीचे अध्यक्ष सुभाष गैजेश यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे ही काळाची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देताना आनंद होत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांना कंपनीचे सातत्याने सहकार्य राहील.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी कंपनीचे आभार मानत या डिजिटल साहित्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी आणि विद्यार्थी-केंद्रित होईल, असा विश्वास व्यक्त केला. शाळा व्यवस्थापन समिती, आजी-माजी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत नागझरी शाळेला पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

“गावामध्ये शाळा असते; परंतु आमच्या शाळेमध्ये गाव आहे,” असे सांगत मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांच्या सहभागाचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि समाजाच्या सहकार्यामुळे नागझरी शाळा ग्रामीण भागातील स्मार्ट डिजिटल शिक्षणाचा आदर्श ठरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *