करंजाडेत स्वच्छतेचा संदेश; आदिवासी बांधवांना डस्टबिनचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मंगेश शेलार यांचा सामाजिक उपक्रम
करंजाडेत स्वच्छतेचा संदेश; आदिवासी बांधवांना डस्टबिनचे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मंगेश शेलार यांचा सामाजिक उपक्रम
पनवेल, ता. 9(बातमीदार) पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी डस्टबिन वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने आदिवासी बांधवांना घरगुती कचरा संकलनासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून आणि परिसरापासून झाली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो डस्टबिनमध्ये जमा करून योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
करंजाडे परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्नही महत्त्वाचा बनत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याबरोबरच प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. डस्टबिन वाटपाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन मिळणार असून, परिसरातील अस्वच्छता कमी करण्यासही मदत होणार आहे.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तर सरपंच मंगेश शेलार यांनी करंजाडे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे आणि निरोगी करंजाडे’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

संपादक : नितीन जाधव





