जुईनगर खून प्रकरणाचा उलगडा; गुन्हे शाखा कक्ष १ ची धडक कामगिरी
जुईनगर खून प्रकरणाचा उलगडा; गुन्हे शाखा कक्ष १ ची धडक कामगिरी – मृताची ओळख व आरोपीचा शोध लागलान
नवीन मुंबई ( प्रतिनिधी) नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष १ यांनी तात्काळ तपास करून जुईनगर परिसरात झालेल्या अनोख्या मृत्यूचे गूढ उलगडत खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. अनोळखी मयत इसमाची ओळख पटवून तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी जुईनगर रेल्वे स्टेशन समोरील सुकलेल्या नाल्यात एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध आढळून आला. नेरूळ पोलिसांनी त्याला तात्काळ मनपा रुग्णालय, वाशी येथे उपचारासाठी दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (रजि. क्र. १००/२०२५) करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सपोआ अजयकुमार लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष १ च्या तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. तपास पथकाने घटनास्थळ, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच कचरा वेचणारे इसम, दारू विक्री केंद्रे आणि मयत इसमाचे साथीदार यांच्याकडून माहिती गोळा केली. मृत इसम कादीर करम हुसेन शेख (उर्फ लखा, उर्फ लंबू) हा कचरा वेचत असल्याचे तसेच त्यास मादक द्रव्ये व देशी दारूचे व्यसन असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान मृत व्यक्ती व आरोपी राजु मंडल यांच्यात भांडण झाल्याची माहिती मिळाली. पुढील तपासात उघड झाले की, मयत इसमाने आरोपी राजु मंडल यांच्या पत्नी बुलबूल हिच्यासोबत गैरप्रकार केल्याने आरोपी संतप्त झाला होता. रागाच्या भरात आरोपी राजु मंडल (वय २७, रा. जुईनगर सेक्टर १० व मूळगाव – पश्चिम बंगाल) याने कादीरच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्याचा खून केल्याचे कबूल केले. दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीस ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाच्या पुढील चौकशीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद खूनात रूपांतरित करण्यात आली असून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७५३/२०२५, बी.एन.एस. कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास नेरूळ पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा उलगडा करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या नेतृत्वाखाली सपोनि निलेश बनकर, सपोनि अनंत लांब, पोउपनि अभय काकड, पोउपनि प्रदीप बोरुडे, पोहवा चंद्रकांत कदम, पोना अझहर मिर्झा आणि पोशि सचिन पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.

संपादक : नितीन जाधव





