राजकीय

भव्य मोर्चासाठी महाविकास आघाडी सज्ज; १६ डिसेंबरला पनवेलमध्ये शक्तिप्रदर्शन     


भव्य मोर्चासाठी महाविकास आघाडी सज्ज; १६ डिसेंबरला पनवेलमध्ये शक्तिप्रदर्शन. पनवेल ( प्रतिनिधी) :पनवेल काँग्रेस भवन येथे शुक्रवार, दि. १२ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने पनवेल शहरातील वाढत्या नागरी समस्यांबाबत लक्ष वेधत १६ डिसेंबरला शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पनवेल महानगरपालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या निर्णयासह रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील प्रदूषण अशा तातडीच्या प्रश्नांवर जनतेच्या वतीने आवाज उठवण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला. आघाडीच्या नेत्यांनी मालमत्ता कर वाढ, अवास्तव बस थांबे, महापालिकेची हलगर्जी धोरणे आणि नागरिकांवर वाढणारा आर्थिक व मानसिक ताण यावर कठोर टीका केली. पनवेलकरांच्या प्रश्नांवर सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ डिसेंबरच्या मोर्चात राज्यपातळीवरील प्रमुख नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेत विमानतळाच्या नामांतराच्या मुद्द्यावरही आघाडीने ठाम भूमिका मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २५ डिसेंबरपासून उड्डाणांची प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याचे सांगून, या विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीने आवाज बुलंद केला आहे. या मागणीसाठी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.                                                                         या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना (ठाकरे गट) उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण घरत, शेकाप विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनसे प्रवक्ते व पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, माजी नगरसेविका लीना गरड तसेच आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेलमधील वाढत्या नागरी समस्यांविरोधात आणि नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *