चाकुचा धाक दाखवून डिझेल चोरी करणारी टोळी कळंबोली पोलिसांकडून गजाआड
महामार्गावर थांबलेल्या वाहनचालकांना चाकूचा धाक; जबरी डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड; कळंबोली पोलिसांची धडक कारवाई, दोन अट्टल गुन्हेगार अटक
कळंबोली ( प्रतिनिधी)महामार्गाच्या कडेला रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनचालकांना चाकूचा धाक दाखवून जबरीने डिझेल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा कळंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 291/2025 भा.न्या.सं. कलम 309(4), 317(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश काशिनाथ चव्हाण (वय 29, रा. फेज-वन, तळोजा, नवी मुंबई; मूळ रा. सोलापूर) आणि जितू अनिल चावला (वय 36, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण सुमारे ५ लाख १९ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये १९ हजार रुपये किमतीचे १७५ लिटर डिझेल, ५ लाख रुपये किमतीची सफेद रंगाची व्हॅगनार कार, ५० रुपये किमतीचा धारदार चाकू तसेच कारची ओरिजनल नंबर प्लेट व डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य यांचा समावेश आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी हे ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून वाहन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर बोगस नंबर प्लेट लावून सदरचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी पनवेल तालुका, कामोठे पोलीस ठाणे हद्दीत तसेच नवी मुंबईतील इतर भागांतही अशाच प्रकारचे डिझेल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात पुढील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आरोपींचा पोलीस ताबा घेण्यात येत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले तसेच डीबी पथकाने केली आहे. कळंबोली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संपादक : नितीन जाधव





