पनवेल येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
पनवेल येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
पनवेल (प्रतिनिधी )पनवेल शहराच्या समग्र आणि सर्वांगीण विकासाचा ठाम संकल्प घेऊन भाजपा–महायुती पनवेल महानगरपालिका निवडणुकीत उतरली आहे. पनवेल येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मंत्री व भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते २० मधून उभ्या असलेल्या सर्व भाजपा उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, पनवेल शहराचा वेगाने होत असलेला विकास अधिक नियोजनबद्ध, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित पद्धतीने पुढे नेण्याचा भाजपा–महायुतीचा संकल्प आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासाची नवी दिशा देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यकर्ता मेळाव्यास माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत एकजुटीने काम करून महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्याचे आवाहन केले.
मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–महायुती शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर जनतेचा विश्वास संपादन करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपादक : नितीन जाधव





