प्रभाग २ मध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ; शक्तीप्रदर्शन
प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ; हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शक्तीप्रदर्शन
महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते मैदानात; जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल (प्रतिनिधी )
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे. शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता नावडे येथील हनुमान मंदिरात सौ. काजल महेश पाटील, सौ. अरुणा किरण दाभणे, श्री. दिनेश रविंद्र खानावकर आणि श्री. कृष्णा सिताराम पाटील या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
मागील आठवड्यापासून या चारही उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू असून, आज धार्मिक विधीच्या माध्यमातून त्याला अधिकृत स्वरूप देण्यात आले. हनुमान मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २ मध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर या उमेदवारांना जनतेकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि मूलभूत विकासकामांमुळे भाजपबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय युवा नेते महेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक २ मधील प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आहे. महिला कार्यकर्त्या व माजी उपसरपंच अमृता पाटील, श्रीनाथ पाटील यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
आगामी काळात घरोघरी जाऊन संपर्क, बैठका, संवाद आणि विकासकामांची माहिती देत जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असल्याचे चित्र असून, निवडणूक रणांगणात भाजप पूर्ण ताकदीने उतरल्याचे स्पष्ट होत आहे.

संपादक : नितीन जाधव





