वीज संकटाविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर ‘अंत्ययात्रा’ खांदा कॉलनीत अनोखे आंदोलन; निष्क्रिय कारभाराचा निषेध
वीज संकटाविरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर ‘अंत्ययात्रा’ खांदा कॉलनीत अनोखे आंदोलन; निष्क्रिय कारभाराचा निषेध
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) खांदा कॉलनी येथे महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात अनोखे आंदोलन छेडले. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने महावितरण कार्यालयावर प्रतीकात्मक ‘अंत्ययात्रा’ काढून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल तसेच इतर परिसरांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये तासन्तास वीज नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे महानगर सचिव पराग बालड, महानगर उपाध्यक्ष संदीप जाधव, कळंबोली मनसेचे राहुल चव्हाण, खांदा कॉलनी विभाग अध्यक्ष सिद्धेश जाधव, महानगर अध्यक्ष (महिला) स्वरूपा सुर्वे, विधानसभा संघटक पूजा मोहन तसेच जिल्हा वाहतूक संघटक सचिन जाधव यांनी केले.
यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर जोरदार टीका करत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून समस्या न सुटल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनामुळे पनवेल परिसरातील वाढत्या वीज संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासन यावर कोणती उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संपादक : नितीन जाधव





