सामाजिक

संतोष भगत यांनी मुलांच्या जीवनात भरले रंग; धुळवडीच्या पूर्वसंध्येला ५० मुलांना रंगांचे वाटप


संतोष भगत यांनी मुलांच्या जीवनात भरले रंग; धुळवडीच्या पूर्वसंध्येला ५० मुलांना रंगांचे वाटप

पनवेल/प्रतिनिधी :

धुळवड म्हणजे रंगांचा आणि आनंदाचा सण. मात्र समाजातील काही दुर्बल घटकांतील मुलांना हा आनंद उपभोगणे अनेकदा शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन सा. रायगड पनवेलचे संपादक तथा अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी धुळवडीच्या पूर्वसंध्येला परिसरातील सुमारे ५० गरजू मुलांना रंगांचे वाटप केले.

ही मुले रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांची असून बहुतांश पालक मोलमजुरी करतात व भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. आर्थिक अडचणींमुळे इच्छ असूनही त्यांना आपल्या मुलांना सणांचा आनंद देता येत नाही. याची जाणीव ठेवून संतोष भगत दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवतात.

यावर्षीही रंगांचे वाटप करताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य विशेष लक्षवेधी ठरले. या छोट्याशा उपक्रमामुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे अनेक रंग खुलल्याची भावना व्यक्त होत होती.

संतोष भगत हे केवळ धुळवडच नव्हे, तर दहीहंडीला अंगणात हंडी बांधून मुलांना सहभागी करून घेतात तसेच दिवाळीत फटाके वाटप करून त्यांचा सण आनंदमय करतात. समाजातील कुणीही सणांच्या आनंदापासून वंचित राहू नये, ही त्यांची भावना असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *