तलावात बुडणाऱ्या महिलेला कळंबोली पोलिसांनी वाचवले.
तलावात बुडणाऱ्या महिलेला कळंबोली पोलिसांनी वाचवले.
कळंबोली, ता.10 (बातमीदार ) रोडपाली येथील गणपती विसर्जन तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव कळंबोली पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने प्रसंगावधान राखत धाडसाने वाचविला. पोलिस शिपाई सागर माळी व आकाश वानखेडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून महिलेला सुखरूप बाहेर काढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दोन्ही कर्मचाऱ्यावर कौतुकाची थाप दिली.
कळंबोली पोलीस ठाण्याच्या कंट्रोल रूममधून रविवारी (दि.10) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बीट मार्शल 1 च्या एम.डी.टी.वर संदेश प्राप्त झाला की, रोडपाली गणपती विसर्जन तलावात एका महिलेने उडी मारली असून तातडीने पोलिस मदतीची आवश्यकता आहे. संदेश मिळताच बीट मार्शल 1 वरील पोलिस शिपाई आकाश वानखेडे आणि पोलिस शिपाई सागर माळी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यावर संबंधित महिला तलावात बुडत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस शिपाई सागर माळी यांनी कोणतीही भीती न बाळगता तत्काळ तलावात उडी घेतली आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने आशा हॉस्पिटल येथे पोलिस वाहनातून उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान, महिलेचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असून पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला एमजीएम हॉस्पिटल येथे पोलिस वाहनातून रवाना करण्यात आले.
अनिता बालाजी नांदे (वय 35, रा. कळंबोली) असे या महिलेचे नाव असून ती काहीशी मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेमुळे कळंबोली पोलिसांच्या तत्परतेचे आणि मानवतावादी भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

संपादक : नितीन जाधव





