सामाजिक

आरटीओ अधिकाऱ्यांची तत्परता; संदीप कोतकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला


आरटीओ अधिकाऱ्यांची तत्परता; संदीप कोतकर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

रायगड (प्रतिनिधी) दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई-गोवा महामार्गावर जेएसडब्ल्यू कंटेनर यार्डसमोर वाहन तपासणी मोहीम राबवित असताना आरटीओ अधिकारी संदीप कोतकर यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची घटना घडली आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सांडलेल्या ऑइलवर माती टाकत धाडसी व कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून दिला.

वाहन तपासणीदरम्यान रस्त्यावर अचानक गर्दी झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन मोटरसायकली रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरून घसरून अपघात झाल्याचे आढळून आले. पुढील तपासात सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर अज्ञात वाहनातून सलग ऑइल सांडल्याचे स्पष्ट झाले. या तेलाच्या पट्ट्यामुळे रस्ता अत्यंत निसरडा बनला होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ वाहतूक थांबविण्यात आली आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, सांडलेल्या ऑइलवर माती टाकण्यासाठी सुरुवातीला कोणीही पुढे येत नव्हते. अशावेळी आरटीओ अधिकारी संदीप कोतकर यांनी आपल्या कार्यालयातील वायुवेग पथक क्रमांक सहा मधील चालक येरलापल्ली व पांडुरंग माळी यांच्या समवेत स्वतः रस्त्यावर उतरून हाताने माती टाकण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे आजूबाजूचे वाहनचालक व नागरिक यांनीही मदतीचा हात पुढे केला. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे शंभर ते दीडशे मीटर लांबीचा तेलाचा पट्टा पूर्णपणे मातीने झाकण्यात आला. ज्या ठिकाणी ऑइलचे प्रमाण अधिक होते, त्या भागात अग्निशामक दलाच्या मदतीने रस्ता पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आला.

वेळीच करण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे पुढील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टळली. घटनास्थळी मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे, वाहनचालकांचे तसेच अग्निशामक दलाचे आभार व्यक्त करण्यात आले.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *