महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेम डांगे / प्रतिनिधी
कळंबोली (प्रतिनिधी ) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.
या आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकल हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांसह सुमारे १० जणांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची सविस्तर तपासणी केली. तसेच आवश्यक ते आरोग्य मार्गदर्शनही देण्यात आले.
या शिबिरात जवळपास १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डॉ. मृणाल आमले यांनी दिली. तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे तसेच नगरसेविका सायली सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रामदास शेवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे परिसरातील अनेक महिलांना व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : नितीन जाधव





