उद्योग

तळोजा फेज-१ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


तळोजा फेज-१ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर व शिवभजन संध्येला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

पनवेल : ( प्रतिनिधी )तळोजा शहर फेज-१ येथील तळोजा शहर पोलीस चौकीच्या मुख्य चौकात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती ६ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शिवप्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. या वेळी उपस्थित शिवभक्तांनी “शिवगर्जना” करत वातावरण दुमदुमून टाकले. कार्यक्रमात तरुण, लहान मुले तसेच मुलींच्या सहभागातून शिवकालीन युद्धकला लाठी-काठीचे सादरीकरण उत्साहात करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी भरभरून दाद दिली.

शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. या अंतर्गत आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई-श्रम कार्ड नोंदणी, फिजिओथेरपी सेवा तसेच रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशन तसेच खारघर येथील वाय. एम. टी. फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या सहकार्याने पार पडले. या आरोग्य शिबिराचा तळोजा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेत सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस यंत्रणा, पनवेल महानगरपालिका तसेच तळोजा परिसरातील व्यापारी आणि शिवभक्तांनी मोलाचे सहकार्य केले. संध्याकाळी मधुर अशा शिवभजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यात हभप सदा बुवा तसेच वारकरी संप्रदायातील मंडळींनी भावपूर्ण भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले.

या शिवजयंती सोहळ्याच्या आयोजनासाठी शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले. अतुल पाटील, कल्पेश माने, अक्षय महाजन, नंदकिशोर राणमाळे, अविनाश कदम, विजय लोहार, अजय राठोड आणि बंदेनवाज जातगर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमास विधानपरिषदेचे आमदार Vikrant Patil, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लिनाताई गरड तसेच तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनीही उपस्थित राहून शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा शिवजयंती सोहळा तळोजा परिसरातील नागरिकांसाठी संस्मरणीय ठरला.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *