कळंबोलीत आधुनिक शैक्षणिक संकुल उभारा; नगरसेवक रामदास शेवाळे यांची महापौरांकडे मागणी
कळंबोलीत आधुनिक शैक्षणिक संकुल उभारा; नगरसेवक रामदास शेवाळे यांची महापौरांकडे मागणी
पनवेल ता. 28(बातमीदार ): कळंबोली सेक्टर-२०, भूखंड क्र. १८ येथील राखीव जागेवर अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्याबाबत कळंबोलीचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यादके मागणीचे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तळोजा व कळंबोली परिसरात आधुनिक शैक्षणिक सुविधा उभारण्याचा निर्णय स्वागतार्ह असून, त्याच धर्तीवर कळंबोलीतही सर्वसुविधांनी युक्त शाळा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सदर भूखंड सुमारे ५,३२२.०६ चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून शाळा व क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. कळंबोली हा महानगरपालिकेतील घनदाट वस्तीचा भाग असून येथे कामगार, रिक्षाचालक, भाजीविक्रेते तसेच निम्न व मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. सिडकोच्या विविध योजनांमुळे येथे हजारो कुटुंबांचे वास्तव्य वाढले असून, त्यांच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.
सध्या परिसरात प्रामुख्याने खासगी शाळा कार्यरत असून, त्यांचे शुल्क सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेक पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वतःची शाळा उभारणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे. प्रस्तावित शैक्षणिक संकुलात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण, प्रशस्त क्रीडांगण, वाचनालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा तसेच मुलींसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे कळंबोलीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या भविष्याला दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.या मागणीसंदर्भात महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती रामदास शेवाळे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आली आहे.

संपादक : नितीन जाधव





