सिडको घरांच्या किंमती कमी; विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश; हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व बाळासाहेब पाटील यांचे आभार !
सिडको घरांच्या किंमती कमी; विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश; हजारो लाभार्थ्यांनी मानले आमदार विक्रांत पाटील व बाळासाहेब पाटील यांचे आभार !
पनवेल ता. 20( बातमीदार )सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे घर’ या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या वाढीव किमती कमी करण्याच्या निर्णयानंतर हजारो लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी एकत्र येत आमदार विक्रांत पाटील व माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचे जाहीर आभार मानण्यासाठी पनवेलमध्ये विशेष ‘आभार व संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पनवेल येथील रॉयल गार्डन लॉनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला सिडको लॉटरीतील विजेते लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत घरांच्या किमती कमी करण्यासाठी आमदार पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले. काही लाभार्थ्यांनी भावनिक होत, या निर्णयामुळे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोकडून सुमारे ६७ हजार घरांचे बांधकाम सुरू असून, त्यापैकी २५ हजार घरांसाठीची लॉटरी यापूर्वी पार पडली होती. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती. काही ठिकाणी या घरांच्या किंमती खाजगी प्रकल्पांपेक्षाही अधिक असल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत हा मुद्दा लावून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठका घेऊन त्यांनी हा विषय मांडला. हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर नगरविकास विभागाच्या बैठकीत सिडकोच्या कारभारावर टीका करत घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर सुमारे १० टक्क्यांनी दरकपात जाहीर करण्यात आली. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संबंधित लोकप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी, “जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हेच माझे कर्तव्य असून, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे हीच माझी खरी कमाई आहे. पुढेही जनहिताचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,” असे सांगितले.

संपादक : नितीन जाधव





