कळंबोली चे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नूतनीकरण करून सर्वसामान्यांसाठी खुले करा, नगरसेवक विजय खानावकर यांची मागणी. परेश ठाकूर यांची अनुकूलता
कळंबोली क्रिकेट पंढरी चे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगनाचे नूतनीकरण होणार; कळंबोलीतील खेळाडूंची निःशुल्क व सर्वांसाठी मैदान खुले ठेवण्याची नगरसेवक विजय खानावकर यांची मागणी
परेश ठाकूर यांची अनुकूलता
कळंबोली ता. 29(वार्ताहर ) कळंबोली सेक्टर १ येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या विकासासंदर्भात नगरसेवक विजय खानावकर यांनी पनवेल पालिकेचे महापौर, आयुक्त व माजी सभागृह नेते नगरसेवक परेश ठाकूर यांना निवेदन देत महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या निवेदनात क्रीडांगणाचे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नियोजन व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सन २०१३ मध्ये सरपंच पदावर कार्यरत असताना नगरसेवक विजय खानावकर स्थानिक नेते व सुमारे ४०० ते ५०० नागरिकांच्या उपस्थितीत क्रीडांगण राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कळंबोली परिसरातील माथाडी कामगार, प्रकल्पग्रस्त व इतर नागरिकांसाठी हे मैदान राखीव ठेवण्यात आले. कळंबोली परिसरातील अनेक नागरिक घाटमाथ्यावरून स्थलांतरित झालेले असल्याने त्यांना पारंपरिक ग्रामीण क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले हे क्रीडांगण त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. या मैदानाचा वापर क्रिकेट सराव, जॉगिंग, व्यायाम तसेच दैनंदिन फेरफटका यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असून दर शनिवारी-रविवारी येथे नियमित क्रिकेट सामनेही आयोजित केले जातात. दरम्यान, क्रीडांगणाच्या विकासासाठी अंदाजे ५० ते ६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. यावर नागरिकांनी आक्षेप घेत, कमी खर्चात पण सर्व आवश्यक सुविधा असलेले क्रीडांगण विकसित करण्याची मागणी केली आहे. तसेच हे मैदान सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामूल्य ठेवावे, अन्यथा शुल्क आकारल्यास माथाडी कामगार व प्रकल्पग्रस्त गटांना ते परवडणार नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक परेश ठाकूर यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याची ग्वाही विजय खानावकर यांना दिली.
कोट
महापालिका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा विकास व नूतनीकरण करत आहे, ही स्तुत्य बाब आहे, परंतु क्रिकेटचे मैदान शाबुत ठेवून त्या अनुषंगाने मैदानाचा विकास करावा, जेणेकरून प्रकल्पग्रस्तांची मुले निःशुल्क मैदानी खेळ खेळतील. माजी सभागृह येथे नगरसेवक परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त व महापौर यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.
विजय खानावकर,
नगरसेवक, कळंबोली

संपादक : नितीन जाधव





