कामोठेतील डे-नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जि. बी. बॉईज विजेते
कामोठेतील डे-नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जि. बी. बॉईज विजेते
पनवेल ता. १८ (प्रतिनिधी) – कामोठे परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरलेली डे-नाईट घरगुती पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सेक्टर २२ येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडली. स्थानिक पातळीवर व्हॉलीबॉलला चालना देण्याच्या उद्देशाने अव्हेंजर्स व्हॉलीबॉल क्लब यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक प्रदीप भगत यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तसेच एस. के. भगत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
पनवेल, खारघर, नवी मुंबई, ऐरोली, ठाणे व कल्याण परिसरातील १६ संघांनी बाद पद्धतीने स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. उपांत्य फेरीत अव्हेंजर्स व्हॉलीबॉल क्लब, एस. जी. व्ही. टी. पनवेल, जि. बी. बॉईज आणि हाईड पार्क अ यांनी स्थान मिळवले. अंतिम सामन्यात अव्हेंजर्स आणि जि. बी. बॉईज यांच्यात तिन्ही संचांमध्ये रंगतदार सामना झाला. निर्णायक क्षणी संयम राखत जि. बी. बॉईज संघाने विजेतेपद पटकावले.
विजेत्या संघाला ७ हजार रुपये रोख पारितोषिक व करंडक, तर उपविजेत्यांना ५ हजार रुपये व करंडक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीबद्दल उत्कृष्ट सेटर म्हणून योगेश बाबर, उत्कृष्ट स्पायकर म्हणून ओंकार हराम आणि उत्कृष्ट लिबिरो म्हणून अथर्व यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विनय नायर, अविनाश शेट्टी, सचिन बेरगळ, सागर आडे, प्रवीण पडळकर, योगेश बाबर आणि सर्वेश विचारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेस डी डी एस आर बिल्डर अँड डेव्हलपर एलएलपी यांचे प्रायोजकत्व लाभले असून त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक सचिन बेरगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेमुळे कामोठे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. अव्हेंजर्स व्हॉलीबॉल क्लबच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

संपादक : नितीन जाधव





