ट्रिपल महाराष्ट्र केसरी नवी मुंबई एसीपी विजय चौधरी हिंदकेसरी स्पर्धेसाठी सज्ज
ट्रिपल महाराष्ट्र केसरी नवी मुंबई एसीपी विजय चौधरी हिंदकेसरी स्पर्धेसाठी सज्ज
साताऱ्यात होणार हिंदकेसरी स्पर्धा
नवी मुंबई दि. 13(प्रतिनिधी )ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विजय नथू चौधरी हे 52 व्या हिंदकेसरी स्पर्धेसाठी सज्ज झाले असून महाराष्ट्रासह महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत ते 14 ते 17 मे दरम्यान सातारा येथे रंगणाऱ्या प्रतिष्ठेच्या हिंदकेसरी मैदानात उतरतील. त्यांच्या सहभागामुळे राज्यातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
39 वर्षीय विजय चौधरी गेली तब्बल 24 वर्षे कुस्ती क्षेत्रात सक्रिय असून मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पोलीस दलातील अत्यंत जबाबदारीची भूमिका सांभाळतानाही त्यांनी कुस्तीतील सातत्य कायम ठेवत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
2014,2015 आणि 2016 या सलग तीन वर्षांत “महाराष्ट्र केसरी” हा मानाचा किताब पटकावत त्यांनी राज्याच्या कुस्ती इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. त्यांच्या आक्रमक आणि ताकदवान खेळशैलीमुळे ते महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्लांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
याशिवाय 2023 मध्ये कॅनडा येथे झालेल्या “वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स ” स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत त्यांनी भारतीय पोलीस दलाचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटला होता.
सध्या भारत केसरी आणि हिंद केसरी किताब विजेते रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चौधरी यांचा कसून सराव सुरू असून हिंदकेसरी स्पर्धेत ते दमदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रतिष्ठेच्या स्पर्धेकडे लागले असून विजय चौधरी पुन्हा एकदा इतिहास रचतील, अशी आशा कुस्तीप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

संपादक : नितीन जाधव





