सिडको घरांच्या किमतीवर नागपुरात आवाज!आ.विक्रांत पाटील यांनी जॅकेट घालून लक्ष वेधले
सिडको घरांच्या किमतीवर नागपुरात आवाज!
आ.विक्रांत पाटील यांनी जॅकेट घालून लक्ष वेधले
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातील अवाजवी दरवाढीविरोधात विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी मंगळवारी नागपूर येथील विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करताना प्रतीकात्मक जॅकेट परिधान करून सरकारचे लक्ष वेधले. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले
सिडकोकडून कमी उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीयांसाठी ‘परवडणारी घरे’ अशी जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात ३०–४० लाखांच्या घरांची किंमत ६० लाखांच्या पुढे गेल्यामुळे ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
२५ हजार घरांसाठी केवळ १० हजार अर्जच प्राप्त झाल्याची धक्कादायक माहितीही आ . विक्रांत पाटील यांनी समोर ठेवली. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सिडकोने दर वाढवल्याने खरेदीदार खाजगी बांधकाम व्यावसायिकांकडे वळले असून, अनेकांना तिथे तुलनेने स्वस्त घरे मिळत असल्याचे चित्रही त्यांनी मांडले. त्यामुळे सिडकोच्या अनेक गृहनिर्माण संकुलांमधील घरे विक्रीअभावी रिकामी पडली आहेत.सिडको आणखी घरे बांधीत आहे. ही घरे भविष्यात विकली जातील की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.सिडकोने यापूर्वीच खाजगी बांधकाम व्यावसायिकांना भूखंड विकून मोठी कमाई केलेली आहे. त्याशिवाय पार्किंग आणि बस टर्मिनल्सच्या सरकारी जागांवर इमारती उभारल्या जात आहेत. अशा स्थितीत जागेचा खर्च नसतानाही घरांच्या किमतीत जागेचे पैसे का धरले जातात असा सवाल त्यांनी केला.आ. पाटील यांनी या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवला असून, सिडकोचे घर प्रकल्प सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावेत यासाठी दर तातडीने पुनर्विचार करून कमी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे.

संपादक : नितीन जाधव





