स्नेहल स्वप्निल ढमाले-पाटील यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड
स्नेहल स्वप्निल ढमाले-पाटील यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड; नागरिकांमध्ये उत्साह, जल्लोष आणि समाधानाचे वातावरण
पनवेल (प्रतिनिधी )
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 (क) मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार स्नेहल स्वप्निल ढमाले यांची बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या ऐतिहासिक निवडीचे स्वागत नागरिकांनी जल्लोषात करत, “आमच्या मनातील नगरसेवक अखेर मिळालाच,” अशा भावना व्यक्त केल्या. स्नेहल स्वप्निल ढमाले हे अत्यंत लहान वयापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असून, प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक तसेच नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने ठाम आणि निर्भीड भूमिका घेतली आहे. जनतेशी थेट संवाद, कामातील पारदर्शकता आणि नागरिकांशी असलेला सातत्यानं संपर्क यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या निवडीमुळे अनेक राजकीय समीकरणांना सुखद धक्का बसला असून, ही निवड म्हणजे जनतेने थेट कामाला दिलेला कौल असल्याची चर्चा पनवेलच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा निर्विवाद विश्वास यामधून अधोरेखित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना नवनिर्वाचित नगरसेवक स्नेहल स्वप्निल ढमाले म्हणाले,
“ही जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या मुकुटामध्ये नागरिकांच्या इच्छा आणि आकांक्षा दडलेल्या आहेत. त्यामुळे मी अधिक मेहनत घेऊन प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. माझा प्रभाग म्हणजे माझा परिवार मानून अविरतपणे काम करीन आणि समाजसेवेचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे पुढे नेईन.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,
“जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि सदिच्छा यामुळेच मला नगरसेवकपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.”
यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
ही बिनविरोध निवड म्हणजे काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास असून, येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 18 (क) चा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

संपादक : नितीन जाधव





