प्रभाग २ मध्ये भाजपाला बळकटी; हरेश पाटील यांचा जाहीर पक्ष प्रवेश
प्रभाग २ मध्ये भाजपाला बळकटी; हरेश पाटील यांचा जाहीर पक्ष प्रवेश
पनवेल ( प्रतिनिधी):सध्या सुरू असलेल्या पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला असून या गटाचे सक्रिय कार्यकर्ते हरेश पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. हा प्रवेश निवडणूक रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हरेश पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली आहे. यावेळी भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २ मधील भाजपच्या संघटनात्मक बळाला मोठी चालना मिळाली असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या संदर्भात माहिती देताना भाजपचे नेते महेश पाटील यांनी सांगितले की, “हरेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते प्रभाग क्रमांक २ मधील भाजपच्या चारही उमेदवारांसाठी पुढाकार घेऊन प्रचार व संघटनाचे काम करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा निश्चितच भाजपला फायदा होणार आहे.”
पनवेल शहराच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या धोरणांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे हरेश पाटील यांनी यावेळी सांगितले. विकासाभिमुख राजकारणासाठी भाजप हाच योग्य पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होत असून येत्या महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांना याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास श्रीनाथ पाटील यांनी केला असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संपादक : नितीन जाधव





