तळोजा फेज २ दिक्षाताई जाधव यांचा पक्षप्रवेश, भाजपची ताकद वाढली
तळोजा फेज–२ मधील दिक्षाताई दिलीप जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश, तलोजा परिसरात भाजपची ताकद वाढली
पनवेल ( प्रतिनिधी)पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज–२ येथील सामाजिक कार्यकर्त्या दिक्षाताई दिलीप जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला असून राजकीय वर्तुळात याची विशेष चर्चा होत आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महंत जितेंद्र महाराज, अरुण भगत जी, केणी, वसंतराव नाईक, निर्दोष केणी, वासुदेव घरात, नितीन भोईर, अशोक शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिक्षाताई जाधव यांचे भाजपमध्ये स्वागत करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
दिक्षाताई दिलीप जाधव यांनी समाजकारण आणि विकासाच्या दिशेने सकारात्मक बदल घडवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्यातील व स्थानिक पातळीवरील विकासकामांमुळे प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे तलोजा परिसरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत याचा भाजपला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

संपादक : नितीन जाधव





