प्रभाग दोन मध्ये काजल पाटील यांचे औक्षण; मतदारांकडून हळदी-कुंकवाचा मान
प्रभाग दोन मध्ये काजल पाटील यांचे औक्षण; मतदारांकडून हळदी-कुंकवाचा मान
पनवेल (प्रतिनिधी)
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचाराचा जोर वाढला असून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार काजल महेश पाटील यांच्यासह अरुण दाभणे दिनेश खानावकर व कृष्णा पाटील या चारही उमेदवारांचा प्रचार झंजावाती स्वरूपात सुरू आहे. गृहभेटी, पदयात्रा आणि थेट मतदार संवादाच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
या प्रभागात प्रचारादरम्यान काजल पाटील यांना महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करून हळदी-कुंकवाचा मान देत आपुलकी व्यक्त केली. तोंड गोड केल्याशिवाय महिला उमेदवारांना पुढे जाऊ देत नाहीत, असे भावनिक चित्र या भागात पाहायला मिळत आहे.
या पारंपरिक सन्मानामुळे मतदार आणि उमेदवार यांच्यात भावनिक नाते व जिव्हाळा निर्माण होत असून प्रचाराला वेगळेच सकारात्मक वळण मिळाले आहे. महिलांचा वाढता पाठिंबा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
एकूणच, हळदी-कुंकवाच्या सन्मानातून व्यक्त होणारा विश्वास आणि जनतेचा उत्साह लक्षात घेता प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजप उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.

संपादक : नितीन जाधव





