राजकीय

भाजपच्या प्रियंका पवार यांचा पक्ष प्रवेश; प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा


भाजपच्या मा. महिला आघाडी शहर अध्यक्षा प्रियंका पवार यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश; प्रभाग ७ मध्ये महाविकास आघाडीला मोठी ताकद

पनवेल ( प्रतिनिधी)

चालू असलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली शहर भाजप महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा प्रियंका पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रभाग क्रमांक ७ मधील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुदाम पाटील यांनी प्रियंका पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात हार्दिक स्वागत केले.

या पक्षप्रवेशामुळे कळंबोली रोडपाली परिसरात काँग्रेस पक्षाला मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात असून महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. प्रियंका पवार यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने प्रभाग क्रमांक ७ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावेळी बोलताना प्रियंका पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून प्रभागाच्या विकासासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी बुधाजी ठाकूर, जगदीश गायकवाड, विद्या गायकवाड, अनिल नाईक, प्रदीप ठाकूर,वीणा पाटील, सुदेशना रायते, जयश्री खटकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या पक्षप्रवेशाचे स्वागत केले असून या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक आणखी सोपी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *