राजकीय

माझा प्रभाग, माझी जबाबदारी’च्या भावनेतून सुदाम पाटील मैदानात; प्रदूषणासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर जोर 


माझा प्रभाग, माझी जबाबदारी’च्या भावनेतून सुदाम पाटील मैदानात; प्रदूषणासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर जोर

पनवेल (प्रतिनिधी )

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मधील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या भावनेतून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सुदाम पाटील यांच्यासह सहकारी उमेदवार प्रदीप ठाकूर, विना पाटील आणि विद्याताई गायकवाड यांनी प्रचाराचा जोर वाढवत सेक्टर १३, सेक्टर १४, महाराष्ट्र स्कूल, गुरुद्वारा, कारमेल स्कूल, आयडीबीआय बँक परिसर, सिडको कार्यालय तसेच कळंबोली येथील शनि मंदिर परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी बोलताना सुदाम पाटील यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्दे मांडले. वाढीव मालमत्ता कराला विरोध, पनवेल परिसरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, कासाडी नदी स्वच्छता अभियान, महिला व बाल सुरक्षेला प्राधान्य, शहरातील वाहतूक कोंडीवर प्रभावी तोडगा, मुबलक व नियमित पाणीपुरवठा, अवजड वाहनांच्या पार्किंग समस्येचे निराकरण, नशामुक्तीसाठी जनजागृती तसेच प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला.

नागरिकांच्या विश्वासावर आधारित कारभार करत प्रभाग क्रमांक ७ चा विकास साधण्याचा निर्धार असल्याचे सांगत सुदाम पाटील यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *