प्रभाग दोन मध्ये “दान पावलं” मत मागायला आली, वासुदेवाची स्वारी!
दान पावलं! मत मागायला आली, वासुदेवाची स्वारी! वासुदेवाच्या गजरात प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचाराचा झंजावात
पनवेल,( प्रतिनिधी) :
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढला असून पारंपरिक व लोककलांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अनोखा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात थेट वासुदेवाच्या वेशातील कलाकार प्रचारात उतरल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीचा प्रचार वेगाने सुरू असून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अरुण भगत आणि प्रीतम म्हात्रे यांच्या उपस्थितीत या भागात प्रचार दौरे पार पडले आहेत. या दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे.
या प्रभागातील प्रचाराची संपूर्ण धुरा आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय महेश पाटील यांच्या खांद्यावर असून त्यांनी प्रचार यंत्रणा प्रभावीपणे उभी केली आहे. घरोघरी भेटी, पदयात्रा, स्थानिक कार्यक्रम यासोबतच वासुदेवाच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश प्रचाराला वेगळेच रंग देत आहे.
वासुदेव आपल्या पारंपरिक ढोलकीच्या तालावर “राष्ट्रहितासाठी मतदान करा”, “लोकशाहीचा सन्मान राखा” आणि “शंभर टक्के मतदान करा” असे संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसत आहेत. उमेदवारांसोबतच वासुदेवही माहितीपर प्रचार करत असल्याने हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुरू असलेल्या या अनोख्या प्रचारामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रचाराच्या या नव्या पद्धतीमुळे मतदारांमध्ये चर्चा रंगत असून निवडणूक प्रचाराला लोककलेची जोड मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

संपादक : नितीन जाधव





