प्रभाग दोनमध्ये भाजपचा विजय निश्चित; रामशेठ ठाकूर बनले आधारवड
प्रभाग दोनमध्ये भाजपचा विजय निश्चित; रामशेठ ठाकूर बनले आधारवड
पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. भाजपचे युवा नेते महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागात प्रचाराचा झंझावात सुरू असून, माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चारही उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधील प्रत्येक गल्ली, सोसायटी व वस्तीमध्ये घरोघरी भेटी, पदयात्रा व संवादाच्या माध्यमातून भाजप उमेदवारांनी संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढला आहे. मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा लेखाजोखा आणि पुढील काळातील विकासाचा अजेंडा मांडण्यात येत आहे. प्रचारादरम्यान नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
या प्रभागातील उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर हे स्वतः पुढाकार घेत असून ते उमेदवारांसाठी खऱ्या अर्थाने ‘आधारवड’ ठरत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला वेग मिळाला असून कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रचार यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपकडून काजल महेश पाटील, अरुणा किरण दाभने, दिनेश रवींद्र खानावकर आणि कृष्णा सीताराम पाटील हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चारही उमेदवार समन्वयाने प्रचार करत असून विकास, नागरिकांच्या सुविधा आणि स्थैर्य या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास संपादन करत आहेत.
निवडणुकीसाठी पुढील आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रचाराची लगबग अधिकच वाढणार आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचारात अधिक तीव्रता आणत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या वातावरणात प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पक्षाच्या गोटात व्यक्त होत आहे.

संपादक : नितीन जाधव





