सामाजिक

कळंबोलीतील पाणीपुरवठा, ड्रेनेज व मूलभूत सुविधांबाबत नगरसेवक विजय खानावकर यांची तातडीची मागणी


कळंबोलीतील पाणीपुरवठा, ड्रेनेज व मूलभूत सुविधांबाबत नगरसेवक विजय खानावकर यांची तातडीची मागणी

पनवेल, ता. 17 (वार्ताहर) : कळंबोली गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, ड्रेनेज व इतर मूलभूत सुविधांच्या समस्यांबाबत नगरसेवक विजय खानावकर यांनी  महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत कळंबोली गावातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कळंबोली गावातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा अनियमित व दूषित स्वरूपाचा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने नवीन व टिकाऊ पाईपलाईन टाकून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच गावातील ड्रेनेज लाईन व गटारे अनेक ठिकाणी जीर्ण अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. उघड्या गटारांवर सुरक्षित झाकण बसवून स्वच्छता व सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संपूर्ण गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून वाहतुकीस सोयीस्कर व सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गावातील सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य ठिकाणी पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था उभारावी तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होऊन नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

वरील सर्व मागण्यांकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *