कळंबोली मध्ये घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव जल्लोषात
कळंबोली मध्ये घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव जल्लोषात
स्वराज्याच्या ‘सुवर्ण होन’ची ४ फूट उंच प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू
पनवेल ता. 19(प्रतिनिधी) घाटी मराठी संघटना, कळंबोली यांच्या वतीने यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक दिमाखात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मध्यरात्री ठीक १२ वाजता १०१ मशालींची मानवंदना देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. मशालींच्या तेजस्वी प्रकाशात महाराजांचा पाळणा आणून विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
घाटी मराठी संघटना दरवर्षी शिवजयंतीनिमित्त काहीतरी वेगळे आणि ऐतिहासिक संदर्भ जपणारे उपक्रम राबवत असते. यंदा संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्वराज्याचे पहिले चलन असलेल्या ‘सुवर्ण होन’ची तब्बल ४ फूट उंच आणि ८ फूट लांब भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. या आकर्षक प्रतिकृतीने शिवभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जाणारा हा ‘सुवर्ण होन’ नाणेप्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७४ साली राज्याभिषेकाच्या निमित्ताने रायगड किल्ला येथे स्वतंत्रपणे जारी केला होता. या सोन्याच्या नाण्यावर नागरी लिपीत ‘श्री राजा शिव’ आणि ‘छत्रपती’ अशी अक्षरे कोरलेली होती. साधारणतः २.८९ ते ३.३ ग्रॅम वजनाचे हे नाणे स्वराज्याच्या आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते.
संघटनेने उभारलेल्या या भव्य सुवर्ण होन प्रतिकृतीसमोर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी प्रतिकृतीसोबत छायाचित्रे काढून हा ऐतिहासिक क्षण जपला. कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे ध्वज आणि पारंपरिक सजावट यामुळे वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, नागरिक, युवक-युवती तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने इतिहासाची जाणीव आणि स्वराज्याच्या अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न घाटी मराठी संघटनेने यशस्वीपणे केला असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. यंदाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे घाटी मराठी संघटनेचा शिवजन्मोत्सव पनवेल परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

संपादक : नितीन जाधव





