सामाजिक

चिलेवाडीतील शेडगे कुटुंबियांचे बंधुप्रेम; मुलगा दत्तक देऊन भावाची मुलगी घेतली दत्तक


चिलेवाडीतील शेडगे कुटुंबियांचे बंधुप्रेम; मुलगा दत्तक देऊन भावाची मुलगी घेतली दत्तक

दत्तक विधान सोहळ्यातून समाजापुढे आदर्श संदेश

Veeje’s                                                           सातारा दि. 18(बातमीदार)कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी येथे शेडगे कुटुंबियांनी बंधुप्रेमाचा आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. ज्ञानदेव शेडगे व पुष्पा शेडगे या आदर्श कुटुंबाने परस्पर संमतीने मुलांच्या दत्तक विधानाचा निर्णय घेत कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ केले आहेत.

चिलेवाडीचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेले संतोष शेडगे, ज्यांचे पंचक्रोशीत आदर्श पोलीस पाटील म्हणून नाव आहे, यांच्या मुलगा शौर्य याला बंधू युवराज शेडगे यांना दत्तक देण्यात आले. त्याचवेळी युवराज शेडगे यांची मुलगी धनश्री हिला संतोष शेडगे यांनी दत्तक घेतले. मुलगी दत्तक घेण्याच्या निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून स्त्री-पुरुष समानतेचा सुंदर आदर्शही या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.दत्तक विधानानंतर शौर्यच्या नावापुढे युवराज शेडगे हे पित्याचे नाव लागणार असून धनश्रीच्या नावापुढे संतोष शेडगे हे नाव नोंदवले जाणार आहे. मंगळवार दि. १८ रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार विधिवत दत्तक विधान सोहळा पार पडला. मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींसह हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला चिलेवाडी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्तक सोहळ्याच्या आनंदाप्रीत्यर्थ शेडगे कुटुंबियांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. चिलेवाडीचे युवा उद्योजक श्रीकांत फाळके यांनी या सोहळ्याचे ‘पुत्रदान व कन्यादान’ असे शब्दांत स्वागत करत शेडगे कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

या दत्तक कार्यक्रमामुळे चिलेवाडीतील शेडगे कुटुंबाने बंधुभाव, समानता आणि कुटुंबमूल्यांचा प्रेरणादायी संदेश समाजाला दिला आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *