कळंबोलीचे मैदान नूतनीकरण करून नि:शुल्क ठेवावे- नगरसेवक विजय खानावकर यांची महापौरांकडे मागणी
कळंबोलीचे मैदान नूतनीकरण करून नि:शुल्क ठेवावे — नगरसेवक विजय खानावकर यांची महापौरांकडे मागणी
पनवेल, ता. 18 (वार्ताहर): कळंबोली येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक विजय मनोहरशेठ खानावकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. नितीन पाटील यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून मैदान सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे नि:शुल्क ठेवण्याची ठाम मागणी केली आहे. क्रीडांगणाचे नूतनीकरण ही अत्यंत स्वागतार्ह व सकारात्मक बाब असली तरी त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, क्रीडांगणाच्या परिसरात कळंबोली गावासह कष्टकरी माथाडी कामगार, हातमजूर, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे मैदानाच्या वापरासाठी शुल्क आकारल्यास अनेक मुलांना खेळापासून वंचित राहावे लागू शकते. खेळ हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम असून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलाचे खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, हीच आमची प्रामाणिक अपेक्षा असल्याचे खानावकर यांनी नमूद केले आहे.
तसेच क्रीडांगणाचा व्यावसायिक हेतूने वापर टाळून ते सार्वजनिक स्वरूपातच उपलब्ध ठेवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. येथे आयोजित होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा, क्रिकेट सामने किंवा इतर उपक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. मैदान हे केवळ खेळासाठीच नव्हे, तर परिसरातील युवकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचे केंद्र बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन खानावकर यांनी केले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही या भूमिकेचे स्वागत करत मैदान सर्वांसाठी खुले आणि मोफत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संपादक : नितीन जाधव





