अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी क्लिनिक’ची सुरुवात
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी क्लिनिक’ची सुरुवात
जीनोमिक्स-आधारित कर्करोग उपचारांची नवी दिशान
वी मुंबई,( वार्ताहर) १९ फेब्रुवारी २०२६ : अपोलो हॉस्पिटल्स च्या नवी मुंबई येथील रुग्णालयात ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी क्लिनिक’चा शुभारंभ करण्यात आला. जीनोमिक्स आणि बायोमार्कर-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना अधिक अचूक, सुरक्षित आणि वैयक्तिकृत कर्करोग उपचार देण्याचा हा अभिनव उपक्रम आहे.
आजच्या काळात एकाच प्रकारचा कर्करोग वेगवेगळ्या रुग्णांमध्ये भिन्न स्वरूपात आढळतो. त्यामुळे पारंपरिक ‘सर्वांसाठी एकच’ उपचार पद्धती अपुरी ठरते. नव्या क्लिनिकमुळे रुग्णाच्या जीनोमिक प्रोफाइल, वय, सह-व्याधी, जीवनशैली आणि वैयक्तिक उद्दिष्टे लक्षात घेऊन उपचार योजना आखली जाणार आहे. त्यामुळे योग्य औषध, योग्य डोस आणि कमी दुष्परिणाम यावर भर दिला जाणार आहे.
मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या लीड कन्सल्टंट डॉ. ज्योती बाजपेयी यांनी सांगितले की, जीनोमिक्समुळे कर्करोगाचा केवळ प्रकारच नव्हे तर त्याचा उपप्रकारही स्पष्टपणे समजतो. उदाहरणार्थ, स्तनाच्या कर्करोगात ल्युमिनल ए, ल्युमिनल बी, ट्रिपल-निगेटिव्ह किंवा एचईआर2 असे उपप्रकार असतात आणि प्रत्येकासाठी उपचार वेगळे असतात. प्रिसिजन ऑन्कोलॉजीमुळे अधिक अचूक निदान आणि परिणामकारक उपचार शक्य होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पश्चिम विभागाचे प्रादेशिक सीईओ अरुणेश पुनेथा यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे प्रत्येक रुग्णासाठी त्यांच्या प्रकृतीनुसार सानुकूलित उपचार पद्धती राबविणे शक्य होणार आहे.
या क्लिनिकमध्ये नेक्स्ट-जनरेशन सिक्वेन्सिंगसह सर्वसमावेशक जीनोमिक प्रोफाइलिंग केली जाणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी ट्यूमर बोर्डद्वारे प्रत्येक प्रकरणाचे परीक्षण करून पुराव्यावर आधारित निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत कर्करोग उपचार क्षेत्रात आधुनिक आणि प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे.

संपादक : नितीन जाधव





