कळंबोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा स्वराज योगा ग्रुपचा उपक्रम; रामदास शेवाळे यांनी पटवून दिले योगाचे महत्त्व
कळंबोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
स्वराज योगा ग्रुपचा उपक्रम; रामदास शेवाळे यांनी पटवून दिले योगाचे महत्त्व
कळंबोली, दि. २१ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कळंबोली सेक्टर-६ येथे स्वराज योगा ग्रुपच्या वतीने सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमामध्ये परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी आरोग्यवर्धक योगक्रिया केल्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी योगाचे महत्त्व विशद केले. योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून मानसिक शांतता, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैलीचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होतो, शारीरिक क्षमता वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
कळंबोली शहरप्रमुख तुकाराम सरक यांनीही नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वराज योगा ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संपादक : नितीन जाधव





