रबाळे पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन; १४ आरोपींवर गुन्हे दाखल
रबाळे पोलिसांचे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन; १४ आरोपींवर गुन्हे, विविध अवैध धंद्यांवर कारवाई
नवी मुंबई : रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवून विविध गुन्ह्यांमध्ये १४ आरोपींवर गुन्हे दाखल केले. तसेच जुगार, दारू विक्री, अमली पदार्थ सेवन यांसारख्या अवैध कृत्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ मार्च रोजी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत परिमंडळ-१ मधील सात पोलीस ठाण्यांतील चार पोलीस निरीक्षक, १६ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १८४ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान गोसावी नाका, अर्जुनवाडी, घणसोली साईनगरवाडी तसेच रबाळे परिसरात तपासणी करण्यात आली. पोलिसांनी अमली पदार्थ सेवन करणारे गुन्हेगार, अवैध दारू विक्री, जुगार तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत एकाच वेळी छापे टाकून कारवाई केली. तसेच फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध, हॉटेल व लॉजेसमधील संशयित व्यक्तींची चौकशी, नाकाबंदी करून वाहन तपासणी अशा विविध कारवाया करण्यात आल्या.
या मोहिमेत दारूबंदी कायद्यांतर्गत एक प्रकरण, अमली पदार्थ सेवनाच्या पाच, अमली पदार्थ बाळगल्याचा एक, जुगाराशी संबंधित चार तसेच अवैध गुटखा विक्रीची दोन प्रकरणे अशी विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच २२ संशयितांची चौकशी करण्यात आली असून २२९ वाहनांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान एका आरोपीकडून देशी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच ब्राऊन शुगरच्या १०० पुड्याही पोलिसांनी जप्त केल्या असून त्यावर शस्त्र कायदा व अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार अवैध धंद्यांविरोधात अशा प्रकारची कॉम्बिंग मोहीम पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस उपायुक्त प्रेरणा कट्टे यांनी स्पष्ट केले.

संपादक : नितीन जाधव





