फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पनवेल शहर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा
मानघर येथील फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; सात जणांवर गुन्हा
पनवेल (प्रतिनिधी ) पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानघर परिसरातील एका फार्महाऊसमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रविवारी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत हुक्का विक्री सुरू असल्याचे आढळून आल्याने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मानघर येथील पाटील फार्महाऊसमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक देवकते यांना दिले.
आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक देवकते व त्यांच्या पथकाने मानघर येथील पाटील फार्महाऊसवर धाड टाकली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्या ठिकाणी ग्राहकांना हुक्का विक्री व सेवा देण्यात येत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जागा मालक, हुक्का पार्लर चालवणारा तसेच वेटर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
या प्रकरणात एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अशा व्यवसायांवर चाप बसला असून अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नितीन ठाकरे यांनी दिला आहे.

संपादक : नितीन जाधव





