गॅस दरवाढ व टंचाई विरोधात पनवेल मध्ये काँग्रेसचा मोर्चा.
गॅस टंचाई व दरवाढीविरोधात पनवेलमध्ये काँग्रेसचा पायी मोर्चा; सिलेंडरची अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन
पनवेल, ता. १२ ( प्रतिनिधी ) : देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाई व वाढलेल्या दरांच्या निषेधार्थ पनवेल शहर काँग्रेसच्या वतीने पनवेल प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढीच्या विरोधात आज पनवेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि नगरसेवक हरेश केनी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत शासनाच्या गॅस धोरणांवर तीव्र टीका केली. गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर आंदोलनकर्त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने निषेध नोंदवला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शासनाने गॅसच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती बजेट कोलमडले असून महिलांना स्वयंपाकासाठी गॅस मिळवताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी रिकाम्या सिलेंडरच्या अंत्ययात्रेत आक्रोश करत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या महागाईविरोधात आणि गॅस दरवाढीविरोधात सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पनवेल शहर काँग्रेसच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉ. अमित दवे, अमित लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो त्रस्त ग्राहक सहभागी झाले होते. आंदोलकांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात घोषणाबाजी करत गॅस दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

संपादक : नितीन जाधव





