सामाजिक

कळंबोलीतील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी महापौरांनी संयुक्त दौरा करावा : नगरसेवक रामदास शेवाळे यांची मागणी


कळंबोलीतील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी महापौरांनी संयुक्त दौरा करावा : नगरसेवक रामदास शेवाळे यांची मागणी

पनवेल :कळंबोली वसाहतीतील वाढत्या वाहतूक कोंडी, अतिक्रमण व पार्किंगच्या समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे महापौरांनी संयुक्त दौरा करावा, अशी मागणी नगरसेवक रामदास वामन शेवाळे यांनी पत्राद्वारे केली आहे.

नगरसेवक शेवाळे यांनी महापौर तितिनजी पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापौरपदाची धुरा स्वीकारल्यानंतर आपण पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाबद्दल त्यांनी महापौरांचे अभिनंदनही केले आहे.

कळंबोली वसाहतीतील प्रभाग क्रमांक ८, ९ व १० या भागांमध्ये सध्या वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि हातगाडीधारकांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. तसेच हातगाडीवर फळे, खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक ठिकाणी पदपथांवरही अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चालण्यासाठीही अडचण निर्माण झाली आहे.

याशिवाय कळंबोली परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून अवजड वाहनांच्या पार्किंगची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचेही शेवाळे यांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेलचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांनी कळंबोली परिसराचा संयुक्त दौरा करून स्थानिक समस्या प्रत्यक्ष जाणून घ्याव्यात आणि संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी अपेक्षा कळंबोलीकरांच्या वतीने नगरसेवक रामदास शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत महेश गोडसे, संजय शेडगे, ओमकार शेवाळे, प्रेम डांगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *