कळंबोलीतील गॅस टंचाई नगरसेवक रामदास शेवाळे यांची पाहणी;
कळंबोलीतील गॅस टंचाई नगरसेवक रामदास शेवाळे यांची पाहणी; सुरळीत वितरणाच्या एजन्सींना सूचना नागरिकांना दिलासा
कळंबोली, पनवेल (प्रतिनिधी):कळंबोली परिसरात सध्या एलपीजी गॅस संदर्भात निर्माण झालेल्या अडचणी, वाढती गर्दी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे यांनी संबंधित गॅस एजन्सींना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी भारत गॅस आणि एचपी गॅस एजन्सीतील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून गॅस पुरवठ्याबाबत माहिती घेतली व नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी दररोज साधारण दोन ट्रक गॅसचा पुरवठा होत होता. मात्र सध्या नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन दररोज तीन ट्रक गॅस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे वितरणात थोडा उशीर होत असला तरी प्रत्येक नागरिकापर्यंत गॅस पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एजन्सी प्रशासनाने दिली.
सध्या केवळ व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली असून घरगुती (डोमेस्टिक) गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. शासनाच्या नियमांनुसार आणि उपलब्धतेनुसार सर्व नागरिकांना गॅस मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रामदास शेवाळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस एजन्सीसमोर अनावश्यक गर्दी करू नये. नागरिकांनी संयम ठेवून शांतता राखावी, गॅस सर्वांना उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि एजन्सी पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे कळंबोली परिसरातील गॅस टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमध्ये तथ्य नसून नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके संजय शेडगे रणजीत फडतरे प्रेम डांगे निलेश दिसले महेश गोडसे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक : नितीन जाधव





