उद्योग

तळोजा पोलिसांची कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई; ३७ किलो गांजा जप्त, दोन जण अटकेत 


तळोजा पोलिसांची कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई; ३७ किलो गांजा जप्त, दोन जण अटकेत 

देविचापाडा परिसरात छापा; सुमारे ३४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत

बातमी :नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३७ किलो गांजा जप्त केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत अंदाजे ३४ लाख २९ हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १३ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान गुन्हेगारांविरुद्ध कारवाई, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, नाकाबंदी व हॉटेल-बार तपासणी अशा विविध मोहिमा राबविण्यात आल्या.

या ऑपरेशनदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देविचापाडा परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी मधुकर म्हात्रे यांच्या चाळीत असलेल्या खोलीतून सुमारे ३७ किलो १२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत अंदाजे ३४ लाख २९ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सागर चिंतामणी महंतो (वय ६०) आणि सावित्री सागर महंतॊ (वय ४८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही देविचापाडा, तळोजा परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत ३९ वाहनांवर कारवाई केली असून दोन बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच हिस्ट्रीशीटर, गुंड व फरार आरोपींची तपासणी देखील करण्यात आली.

ही कारवाई नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर हे करीत आहेत.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *