दुहेरी खून प्रकरणातील आरोपी ९० तासांत गजाआड; तळोजा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
दुहेरी खून प्रकरणातील आरोपी ९० तासांत गजाआड; तळोजा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक; लोखंडी पाईपने मारहाण करून दोन जणांचा खून
तळोजा : तळोजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाचा अवघ्या ९० तासांत उलगडा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे तळोजा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
दि. ३ मार्च २०२६ रोजी तळोजा एमआयडीसी परिसरातील आयजीसीपीएल येथे प्लॉट क्रमांक टी-३/९/९ जवळ रस्त्यावर एक इसम मृतावस्थेत व दुसरा इसम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून एका व्यक्तीचा खून केला असून दुसऱ्या व्यक्तीला गंभीर जखमी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१) व १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलिस सहआयुक्त संजय येनपुरे, पोलिस उपआयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत यांनी विशेष तपास पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी अवघ्या ९० तासांत त्याला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तृष्णिक विश्वासरूप घोष (वय ३३) असे असून तो सध्या तळोजा एमआयडीसी परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मूळचा तो पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात पैशांच्या वादातून भांडण झाले होते. या वादातून आरोपीने लोखंडी पाईपने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात साईनाथ भुय्या पाटील (वय २१) यांचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर तळोजा पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला ४ मार्च २०२६ रोजी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संपादक : नितीन जाधव





