तळोजा येथे पोलिसांची धडक कारवाई; १ कोटींचे अमली पदार्थ जप्त
तळोजा येथे पोलिसांची धडक कारवाई; १ कोटींचे अमली पदार्थ जप्त
पनवेल, दि. २४ (प्रतिनिधी) – नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात कारवाई करून दोन पंजाबी आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे १ कोटी २ लाख रुपयांच्या किमतीचे १९८ ग्रॅम हेरॉईन व १४३.६ ग्रॅम अफू असा अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रेरणा कट्टे- पाटील यांनी दिली
नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निळे यांच्या पथकाला महावीर मजेस्टी, घोट कॅम्प, तळोजा येथे सुरिंदर सिंग उर्फ काळू आणि त्याचा भाऊ मंदीप सिंग हे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार २३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी सुरिंदर गुरजंत सिंग (वय २४ वर्षे) व मंदीप गुरजंत सिंग (वय २७ वर्षे) या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे विठालसिंगवाला, जि. मोगा, पंजाब येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
झडतीदरम्यान आरोपींकडून १९८ ग्रॅम हेरॉईन व १४३.६ ग्रॅम अफू असा एकूण १,०२,११,९०० रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपी हे अमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगून असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(सी), २१(बी), १८ व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त धर्मपाल बनोटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निळे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली. पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

संपादक : नितीन जाधव





