क्राईम

मोटर वाहन निरीक्षकास धक्काबुक्की; तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल


मोटर वाहन निरीक्षकास धक्काबुक्की; तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल

ओव्हरलोड वाहनावर दंडाची कारवाई केल्याचा राग; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

रणजित फडतरे / प्रतिनिधी

पनवेल : 11  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे विशेष तपासणी मोहिमेवर नियुक्त असलेल्या मोटार वाहन निरीक्षकावर शासकीय कर्तव्य बजावत असताना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि धमकी दिल्याची गंभीर घटना तळोजा एमआयडीसी परिसरात घडली आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथे कार्यरत असलेले अविनाश पाटील हे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या आदेशानुसार सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे विशेष तपासणीसाठी नियुक्त आहेत.

ता.10 रोजी तळोजा एमआयडीसी परिसरात वाहन तपासणी सुरू असताना MH46F2641 क्रमांकाचे वाहन सुमारे चार टन ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान वाहनाचा कर भरलेला नसल्याचे तसेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि नॅशनल परमिट ऑथोरायझेशन यांची वैधता संपलेली असल्याचे आढळून आले. या गंभीर नियमभंगांमुळे मोटार वाहन कायदा व अधिनियम अंतर्गत विविध कलमांनुसार संबंधित वाहनावर ई-चलान क्रमांक 50 हजार 500 तडजोड शुल्काची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या कारवाईचा राग मनात धरून नितीन रॉय व त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने मोटार वाहन निरीक्षक अविनाश पाटील यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. त्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली, अश्लील शिवीगाळ केली तसेच खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित वाहन हे एल.ई. कॅरीअर्स प्रा. लि. कंपनीच्या नावे असतानाही “माझ्या वाहनावर चलान का दिले?” असा जाब विचारत वाद घातल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर पाटील यांनी तात्काळ तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *