महिला अत्याचाराविरोधात “ऑरेंज द वर्ल्ड” कॅम्पेन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न
महिला अत्याचाराविरोधात “ऑरेंज द वर्ल्ड” कॅम्पेन पनवेलमध्ये उत्साहात संपन्न.
पनवेल ता. 11(संजय कदम)महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी, वीर वुमेन्स फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या तीन सामाजिक संस्थांनी पनवेल पोलिसांच्या सहकार्याने “ऑरेंज द वर्ल्ड” जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या उपक्रमाला पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तसेच वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिलेले सहकार्य विशेष ठरले. रॅलीची सुरुवात वडाळे तलाव परिसरातून करण्यात आली. रॅलीदरम्यान पोलिसांचे बाईक पथक अग्रस्थानी होते, तर सर्व महिला सदस्यांनी शिस्तबद्धतेने त्यांच्या मागे रॅली काढली. वडाळे तलावातून मार्गक्रमण करत रॅली जेष्ठ नागरिक हॉल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जय भारत नाका, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा मार्गे पनवेल बस स्टँड परिसरातून पुन्हा वडाळे तलावावर परत आली. बॅनर आणि प्लेकार्डद्वारे महिलांविरोधातील हिंसाचाराविरोधातील संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. रॅलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांजुर्णे यांनी महिलांसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत संकटाच्या वेळी स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. सर्व महिला सहभागी ऑरेंज ड्रेस कोडमध्ये दिसून आल्या, ज्यामुळे जनजागृतीची थीम अधिक ठळकपणे अधोरेखित झाली. इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीमार्फत यंदा ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय थीमअंतर्गत महिलांवरील अन्यायाविरोधात विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली. या वेळी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सिंपल आंचलिया, सेक्रेटरी युक्ती शाह, पीपी ध्वनी तन्ना, आयपीपी प्रतिभा डांगी, खजिनदार ममता ठक्कर, एडिटर मौसमी गोगुला, जॉइंट सेक्रेटरी वैशाली कटारिया, सीसी प्रिया चतुर्वेदी यांच्यासह नम्रता बांठिया, शिला शाह, डॉ. भावना मुरुडकर, किर्ती मुनोत, दुर्गा चौधरी आदी सदस्य उपस्थित होते. तसेच वीर वुमेन्स ग्रुपच्या पुनम जैन, श्रुती निस्सर, सीमा जैन आणि रोटरी क्लबचे हर्मेश तन्ना, रोहित जाधव, दिप्ती जाधव यांनीही या रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला. पनवेलमधील हा उपक्रम महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृतीचा प्रभावी संदेश ठरला.

संपादक : नितीन जाधव





