उद्योग

पनवेलमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव; महाविकास आघाडीचा सत्ताबदलाचा निर्धार; बाळाराम पाटील यांचा पालीका सत्ताधाऱ्यावर घणाघात


पनवेलमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव; महाविकास आघाडीचा सत्ताबदलाचा निर्धार; बाळाराम पाटील यांचा पालीका सत्ताधाऱ्यावर घणाघात

कळंबोली (प्रतिनिधी):

महाविकास आघाडीची विजय संकल्प सभा कळंबोली येथे पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे नेते बाळाराम पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत पनवेल शहरात धनाचा व बळाचा गैरवापर करून बिनविरोधच्या नावाखाली मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केला.

पनवेल शहराला विकासाच्या नावाखाली काहीच मिळाले नसून फक्त मालमत्ता कराचे ओझे देण्यात आले असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. आज पनवेलमध्ये वीज नाही, पाणी नाही, सुरक्षा नाही; मात्र बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला सुरक्षा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदारच सत्ताधारी बनले असून निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. धनशक्तीविरुद्ध जनशक्ती उभी करत जनतेला बांधील असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन बाळाराम पाटील यांनी केले. कळंबोली परिसरातील महाविकास आघाडीच्या १६ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले.

या वेळी राजेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, सतीश पाटील यांच्यासह नगरसेवक पदासाठी उभे असलेले सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारासह कळंबोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पनवेल दिनांक

संपादक : नितीन जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *