आमदार विक्रांत पाटील यांची राज्यस्तरीय समितीवर निवड
आमदार विक्रांतदादा पाटील यांची राज्यस्तरीय समितीवर निवड
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ समितीचे सदस्यपद बहाल
पनवेल दि. 25 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवर आमदार विक्रांतद पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार असून महसूल विभागाशी संबंधित प्रश्न सोडविण्यास गती मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या थेट शिबिरांच्या माध्यमातून सोडविणे हा आहे. जमीन नोंदी, फेरफार, सातबारा उतारा, वारस नोंद, नामांतरण तसेच इतर महसूल विषयक प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्यावर आमदार विक्रांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल पनवेलसह महाराष्ट्रातील कार्यकर्ते व नागरिकांकडून आमदार विक्रांत पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले.
या नियुक्तीमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार असून नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि जलद मिळण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संपादक : नितीन जाधव





