पनवेलमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अॅक्वेरियम केंद्र; आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीला गती
पनवेलमध्ये उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अॅक्वेरियम केंद्र; आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीला गती
मंत्री नितेश राणे यांचा सकारात्मक प्रतिसाद; संबंधित विभागांसोबत विशेष बैठक संपन्न
पनवेल, दि. 5(बातमीदार)पनवेल शहराच्या पर्यटन आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्य अॅक्वेरियम केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार विक्रांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मध्ये मांडलेल्या या प्रस्तावाला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात विशेष बैठक आयोजित केली.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलचे भौगोलिक महत्त्व अधोरेखित करत या प्रकल्पाची गरज सविस्तरपणे मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ तसेच नैना प्रकल्पामुळे वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता हा अॅक्वेरियम प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी पनवेलमधील मत्स्य उपकेंद्राच्या जागेचा वापर करण्यात येणार असून ही जागा गोडे व खारे पाणी उपलब्ध असलेली आहे. ही जमीन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेसाठी मत्स्यव्यवसाय विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे बैठकीत ठरले.
या अॅक्वेरियममध्ये सागरी व गोड्या पाण्यातील विविध जलजीवांचे प्रदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे “सी लायन शो” यांचा समावेश असणार आहे. प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.
या बैठकीस मत्स्य विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे अधिकारी तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पनवेलच्या विकासात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि पर्यटनासोबतच रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन व शैक्षणिक संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.

संपादक : नितीन जाधव





