रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा शेकडो युवकांना जागेवरच नोकरी
रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा शेकडो युवकांना जागेवरच नोकरी
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळावा व मोफत कौशल्यविकास अभ्यासक्रम नोंदणी उपक्रमाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील तब्बल १२० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. मेळाव्यास ५१९ नोकरी इच्छुक युवक-युवती उपस्थित होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेत त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, शेकडो उमेदवारांची जागेवरच नोकरीसाठी निवड करण्यात आली, तर उर्वरित उमेदवारांना विविध कंपन्यांकडून पुढील मुलाखती व निवड प्रक्रियेसाठी बोलावणे देण्यात आले आहे.
यावेळी मोफत कौशल्यविकास अभ्यासक्रमांसाठीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आली. युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त व्हावीत, त्यांना विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.
कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, माजी सभागृह नेते बबन मुकादम, नगरसेविका सायली सरक, नगरसेवक रवी भगत, शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, पुण्यवंत खटकाळे, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, निलेश दिसले, बबन बारगजे, संजय शेडगे, प्रेम डांगे, अण्णासाहेब जाधव, नवनाथ वणवे, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. समाजातील तरुणांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेले रामदास शेवाळे यांनी वाढदिवसानिमित्त रोजगारनिर्मिती व कौशल्यविकासाला चालना देणारा हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मेळाव्यामुळे अनेक युवकांच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संपादक : नितीन जाधव





